Tuesday 31 December 2019

आफ्रिकेच्या जंगलात..

लेखक :हेमंत ढवळे




                              जंगल आणि त्याबद्दलच प्रेम हे माझ्या आवडीचा एक भाग. जंगलातील निरव शांतता, विविध पक्षी आणि प्राण्याचे आवाज, उंच-उंच झाडे, आणि घनदाट वनराई मला नेहमीच प्रेमात पाडते. मूळचा विदर्भातील असल्यामुळे ताडोबाच्या जंगलात भरपूर भटकंती करायची संधी मिळाली. आता आफ्रिकेचा जंगलात फिरताना त्या अनुभवाची नक्कीच मदत होईल अस मनोमन वाटलं. आमचा मुक्काम सद्या साऊथ आफ्रिकेचा जोहान्सबर्ग या शहरात होता. 


जोहान्सबर्ग ते क्रूगर नॅशनल पार्क असा जवळपास 700 किलोमीटर चा प्रवास. प्रवास आपल्या कार नि करायचं अस ठरलं. माझ्या सोबत ऑफिस मधेच काम करणारी तीन मित्र होती. त्यात दोन विदर्भातील आणि एक हैद्राबाद चा. आम्ही तीन दिवसाच्या जंगल सफारी चा प्लॅन आखला त्या प्रमाणे ऑनलाईन बुकिंग केली. आम्ही जंगलात फ़ॉरेस्ट गेस्ट हाऊस ची बुकिंग केली होती. मला जंगलात रात्री मुक्कामाचा अनुभव घायचा होता जो भारतात नाही घेता येत कारण आपल्याकडे तेवढ्या सोयी नाही जंगलात, आणि गेस्ट हाऊस पण फार कमी ठिकाणी आहेत. प्रवासाला निघायच्या अगोदर तिथल्या भोगोलिक आणि जायच्या रस्त्याची माहिती घेतली.ऑफलाईन गुगल मॅप्स डाउनलोड करून घेतले कारण जंगलात मोबाईल नेटवर्क नसणार याची माहिती घेतली होती . तसेच गरजेच्या गोष्टी सोबत घेतल्या जसे बॅटरी, फर्स्ट एड किट वगैरे. 

क्रूगर नॅशनल पार्क हे 19,485 km2 (7,523 sq mi) एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरले आहे. एवढ्या मोठा हा परिसर, साऊथ आफ्रिका या देशाच्या दोन राज्यात विभागाला गेला आहे. एक म्हणजे लिम्पोपो राज्य आणि दुसरे पुमलांगा राज्य. या जंगलाच्या उत्तरेकडे झिम्बावे हा देश आहे. हा देश आपल्या माहितीचा असणार, कारण आपण त्यांच्या सोबत क्रिकेट खेळतो, त्यामुळे या देशाचे नाव नक्कीच कानावर आले असेल. या जंगलाच्या पूर्वेला दुसरा देश म्हणजे मोझाम्बिक ज्याचा अगदी पूर्वेचा भाग हा हिंद महासागराला लागला आहे. 


                                                                  प्रवासाचा पहिला दिवस




प्रवासाचा दिवस उजाडला आता आमच्या सर्व योजने प्रमाणे सकाळी पाचला जोहान्सबर्ग वरून निघालो. गूगल मॅप्स चा मदतीने आमचा प्रवास सुरु झाला. आमच्या चौघांमध्ये मीच फक्त गाडी चालवणारा कारण बाकी लोकांना गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता, म्हणून मनोमन मी ठरवले की मला एकट्यालाच एवढा मोठा टप्पा पार करायचा आहे. जोहान्सबर्ग शहर सोडताच आठ पदरी महामार्ग लागला. माझा महामार्गावर गाडी चालवण्याचा अनुभव म्हणजे आपल्या पुणे ते मुंबई महामार्गावरचा प्रवास. पण हा अनुभव वेगळा होता, कारण इथे फास्ट लेन मध्ये जाणारे आपली लेन सोडून दुसऱ्या लेन मध्ये जात नव्हते आणि जड वाहने सर्वात शेवटच्या लेन मध्ये ठरवून दिलेल्या वेग मर्यादेत आपली वाहने चालवत होती. त्यामुळे मला ही ड्रायविंग आनंदाचा सुखद धक्का देऊन गेली. माझा ड्रायविंगचा अर्धा ताण कमी झाला. कल्च आणि ब्रेकची गरजच नाही वाटली, गाडी फक्त एस्कलेटर वर पाय ठेऊन सरळ चालली होती
 .


 रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार माळरान , निळंशार आकाश आणि सोबत हिंदी, मराठी तर कधी इंग्रजी गाणी असा आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरु झाला. आफ्रिका म्हणजे भुरटी जंगले, ओसाड जमीन अशी काहीशी कल्पना माझ्या डोक्यात होती पण इथे सद्या उन्हाळा असल्यामुळे सर्वीकडे हिरवेगार डोंगरे दिसत होते. इथे दोनच मुख्य ऋतू असतात एक म्हणजे हिवाळा आणि दुसरा उन्हाळा. उन्हाळ्यात दिवसभर ऊन पडते आणि रात्री पाऊस त्यामुळे शेती इथे बहुदा उन्हाळ्यात करत असावे असे मनोमन वाटले. आपल्याकडे महामार्गावर दर 10-15 किलोमीटर ला एक तरी गाव लागते, पण आमच्या प्रवासात 50-100 किलोमीटरच्या टप्यात एखादीच गाव लागले असावे. गाव म्हणजे फक्त 10-20 घरे आणि गावा जवळ काही गुराखी गायी राखत दिसले तेवढेच. गुराखी बहुदा काळे लोकच होते. इथे तीन प्रकारच्या वर्णाचे लोक आढळतात काळे(मूळचे आफ्रिकन), गोरे(यूरोपीय) आणि कलर्ड(भारतीय व इतर) म्हणजे सावळे. प्रवासात ज्या गाड्या दिसत होत्या त्यात बहुतेक स्पोर्ट कार होत्या, त्याला मागे बग्गी लावलेली होती. त्यात जणू सर्व संसार घेऊन फिरायला निघाले असेल हे लोक असे मला जाणवले , कारण त्या बग्गीत सायकली, खुच्या, किचन शेगडी, बेड असे सर्व गृहपयोगी सामान त्यांच्या सोबत असे .त्या गाड्या बहुतेक सर्व गोऱ्या लोकांच्या होत्या. हे लोक खरंच सुट्ट्या कश्या घालवायच्या याची कलाच, जणू त्यांना अवगत आहे, असे मला जाणवले.

 प्रत्येक 200 किलोमीटरला एक ब्रेक घायचा असा आम्ही नियम ठरवला होता, त्या प्रमाणे महामार्गाच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपावर आम्ही थांबलो. आपल्याकडे जसे महामार्गावर फूड प्लाझा आहे, तसेच इथे पेट्रोल पंपाला लागून जे फूड शॉप असते, त्याला गॅरेज म्हणतात. तिथे चहा, कॉफी वगैरे मिळतात. जवळपास 400 किलोमीटर अंतर आम्ही 4 तासात गाठले. रस्ते उत्तम असल्यामुळे ते अंतर कसे गाठल्या गेले हे कळलंच नाही. 














400 किलोमीटर नंतर डोंगराळ मार्ग लागला रस्त्याच्या दोन्ही कडेला उंच-उंच पाईन वृक्ष आणि खाली-वर होत सरळ रेषेत जाणारा रस्ता, हिरव्या डोंगररांगा. जणू "स्वर्ग हाच आहे या धरणीवरचा" अशी कल्पना माझ्या मनात क्षणभर आली. जवळपास 100 किलोमीटर असाच पाईन वृक्षांनी वेढा घातलेला मार्ग बघून सर्व प्रवासाचा माझा थकवा निघाला. पुढे साबी नावाचं एक हिल स्टेशन लागलं, इथे आल्यावर मला आपल्या कडच्या कुल्लू-मनालीला आल्यासारखं भासलं . सर्वीकडे हॉटेल, रेस्टोरंट, दुकानें आणि काही जोडपे रस्तावर फिरतांना दिसले. इथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही आमच्या शेवटच्या टप्याच्या प्रवासाला निघालो. आम्ही जवळपास 550 किलोमीटर पार केले होते. सोबत एक मित्राने आणलेले पोहे केव्हाच संपले होते , तेव्हा वाटेत मिळेल ते खात आमचं लंच आम्ही उरकलं. कारण इथे आपल्या भारतीय पद्धतीचं जेवण मिळणार नाही याची पुरेपूर कल्पना होती. 

आता आम्ही लिम्पोपो नावाच्या राज्यात पोहोचलो होतो. इथे येताच पोलिसांनी आमची गाडी थांबवली. आता पोलीस म्हटलं की सर्वाना धसका बसला.काय विचारेल, काय-काय कागदपत्रे मागेल याची काळजी वाटली सर्वाना. पण गोष्ट खुप सरळ मार्गात सुटली, त्यांनी ड्रायविंग लायसन चेक केले, माझ्याकडे भारतीय ड्रायविंग लायसन होत, ते इथे चालते, त्यामुळे कुठे चालले एवढं विचारून विषय संपला, जाता जाता त्यांनी आम्हाला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी कस जायचं याचा मार्ग पण सांगितला. 

लिम्पोपो राज्य लागतंच खरं आफ्रिका दिसायला लागलं, कडक ऊन, दूर-दूर खुरटी झुडपे, सर्वीकडे काळ्या वर्णाचे उंच धिप्पाड लोक, आणि बेशिस्त वाहने चालवणारी स्थानिक लोक. हा 50 किलोमीटर चा रस्ता पार करता करता माझा आक्खा जीव निघाला. आता शेवटचे 100 किलोमीटर बाकी होते दुपारी जवळपास 12-12:30 वाजले होते आणि चोहीकडे आता जंगल दिसायला लागले होते. रस्त्याच्या दोन्ही कडेला तारेचे कुंपण केले होते, कारण बहुतांश जागा या खाजगी रिसॉर्ट वाल्याच्या होत्या ते तिथे हरीण, बायसन, हत्ती, जिराफ वगैरे जनावरांना पाळतात आणि पर्यटकाना मुक्कामाच्या सोयी सुविधा पण तिथे असतात. जंगल सफारी वगरे ते तिथे मुकामाला असलेले पर्यटकांना करवतात. आमचा मुक्काम जंगलाच्या आत असल्यामुळे आम्हाला अगोदर जंगलाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचायचे होते. क्रुगर नॅशनल पार्कला जवळपास 15-20 गेट आहे त्यात आम्हाला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या गेट वरून जायचे होते. त्या गेटच नाव पालाबोरवा गेट असे होते. जवळपास दुपारी 1:30 च्या सुमारास आम्ही पालाबोरा गेट ला पोहोचलो आणि मला माझ लक्ष गाठल्याच समाधान वाटलं, कारण एका अनोळखी देशात गावे-शहरे, डोंगर-दऱ्या पार करत आम्ही क्रूगर च्या प्रवेशद्वाराला पोहोचलो होतो. 
इथे पोहोचतास मोबाईल ला रेंज मिळाली सर्वांनी आपल्या फेसबुक स्टेटस चेक-इन केले आणि सुखरूप पोहोचल्याची माहिती मित्र-मंडळीना दिली. फेसबुक व्हाट्सअप हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच म्हणावं लागेल. 

गेट वर पोहोचताच एन्ट्री फीस आणि बुकिंग फॉर्मॅलिटी चेक करून आम्हाला आता जंगलात सोडले. गेट वरून आम्ही जिथे मुक्कामाला होतो ते मोपाणी रेस्ट कॅम्प 76 किलोमीटर होते पालाबोरवा गेट पासून . आता आमचा पुढचा प्रवास जंगलातून होणार होता. मोपाणी रेस्ट कॅम्पचे गेट संद्याकाळी 6:30 ला बंद होणार असे आम्हाला पालाबोरवा मेन गेट वर च्या फ़ॉरेस्ट गार्ड नि सांगितलं होतं. आम्ही गेट वरून जवळपास दुपारी दोन ला निघालो म्हणजे आमच्याकडे जवळपास 04:30 तास होते आणि फ़ॉरेस्ट गार्डनि सांगितलेल्या सुचने प्रमाणे गाडीचा स्पीड टार(डांबरी) रोड ला 60 किमी/ताशी आणि कच्या रोड ला 40 किमी/ताशी एवढाच ठेवायचा होता.आता आमच्याकडे 76 किलोमीटर पार करायला 04:30 तास होते त्यामुळे आम्ही निवांत जंगल सफारी करायचं ठरवलं. आणखी एक महत्वाची सूचना त्यांनी दिली की गाडीतून खाली उतरू नका, आणि उतरले तरी, तुम्ही स्वतःच्या रिस्क वर उतारा, आम्ही त्याची जवाबदारी घेणार नाही. ही धोक्याची सूचना मनात भीतीला घर करून गेली. 


19,485 km2 एवढ्या विस्तीर्ण परिसरात पसरलेलं जंगल. त्यात खुंकार जंगली प्राणी जसे सिहं, हत्ती, चिता, हायना (कोल्हा) आणि बरेच काही प्राणी, पाऊस पडल्यामुळे थोडी दाटीने वाढलेली झाडे-झुडपं, रस्त्या पलीकडे एखादी जनावर असेल तरी दिसणार नाही असं हे जंगल . मनात थोडी भीती आणि तेवढीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

10-15 किलोमीटर अंतर पार करत, आम्ही काही दिसते काय याचा शोध घेत आमची गाडी पुढे जात होती. तेवढयात एक भलं मोठं डोंगर लागलं. हे डोंगर नक्कीच नेहमीच्या डोंगरासारख नव्हतं.हे खडकाळ डोंगर जणू मोठं-मोठया शिला एकावर एक ठेवल्या असाव्यात असं वाटत होतं. डोंगर उताराला मोठं-मोठ्या खडकाच्या शिला एका वर एक ठेऊन जणू कमानच (गेट) बनवली असावी असे भासले, आणि ती कमान आम्हाला वेल-कम टू क्रूगर म्हणत असावी असे क्षणात वाटले. आमचा रस्ता हा डोंगराला वळसा घेऊन पुढे जाणारा होता. त्या डोंगऱ्याच्या उंच कड्या कडे बघितलं तेव्हा क्षणात असं वाटलं की कुणी तर प्राणी त्या कपारीवर बसून येण्या-जाण्याऱ्यावर लक्ष ठेवत आहे, पण मला काही दिसलं नाही तिथे, तो माझा भासच होता . डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आम्हाला पहिलं दर्शन घडलं ते गजराज्यांच(हत्तीच ) . मनात कल्पना आली जसं कुठल्याही कार्यक्रमाची सुरवात जसे आपण गणरायाला वंदन करून करतो, तसेच आम्हाला आमच्या प्रवासाच्या सुरवातीला जणू हत्तीच्या रूपात गणपतीने दर्शन दिले. आणि आमचा प्रवास सुखाचा होवो असा जणू आशीर्वादच द्यायला उभा असावा तो असे मला वाटले . मनाला थोडं समाधान पण वाटलं की आता प्राणी दिसायला सुरवात झाली. हत्ती थोडया दूर अंतरावर होता आणि नेमका कॅमेरा गाडीच्या मागच्या डिक्कीत बॅग मध्ये ठेवला होता. संपूर्ण प्रवासात कॅमेराची गरज नाही वाटली कारण बहुतांश फोटो मोबाईल मधेच काढले आम्ही . आता थोडी खंत पण वाटली की कॅमेरा मध्ये दूरचा हत्तीचा फोटो छान आला असता. पण मोबाईलनीच फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो, कारण सुचने प्रमाणे गाडीच्या खाली उतारायचंय नव्हतं.
















 थोड्या 4-5 किलोमीटर अंतर गेल्यावर आणखी एक हत्ती जवळपास 100-150 मीटर अंतरावर यथेच्छ झाडांच्या फ़ांद्या तोडून खात होता. आमच्यातला एक वैदर्भीय मित्र बोलला हिम्मत करून, मी काढतो गाडीच्या डिक्कीतून कॅमेरा, लावा गाडी कडेला. मी त्याला परत विचारलं. नक्कीना ! बघ नाही तर नेईल तुला एकद जनावर झडप मारून उचलून. तो बोलला काढतो मी, काही होणार नाही. तो जवळपास 1 मिनिट गाडीतुन उतरून कॅमेरा काढे पर्यंत सर्व जण आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. काही व्हायच्या आता तो कॅमेरा आणि काही खायच्या वस्तू काढून गाडीत येऊन बसला, आणि आम्ही आमचा रोखलेला स्वास सोडला. हत्तीचे छान फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो. 

समोर काही अंतर गेल्यावर एक छोटा पूल लागला. खाली एक ओढा होता त्यात पाणी फार थोडे होते, पण असे जाणवत होते की नुकताच पूर आला असावा यात, कारण डोंगराळ भाग असल्यामुळे पाणी लगेच वाहून जात असावं अस वाटलं. या ओढ्यात काही प्राणी दिसेल म्हणून मी गाडी थांबवली. पुलावर गाडी कडेला लावून मी थोडा वेध घेतला सभोवतालच्या परिसराचा. पण तिथे काही दिसले नाही. मी आता ड्रायविंग करून थकलो होतो, म्हणून सहजच बाकीच्यांना विचारलं कुणाला गाडी चालवायची आहे काय? आमच्यातल्या दोघांना थोडा बहुत गाडी चालवायचा अनुभव होता, पण नवशिकेच म्हणावं असे होते ते. मनात विचार केला की जंगलात काय काही ट्राफिक नाही, किव्हा काही दूर दूर पर्यंत वाहने नाही, म्हणून मी एका मित्राला गाडी दिली चालवायला. तो हो म्हणाला म्हणून, आणि मी पटकन मागच्या सीट वर येऊन बसलो. गाडी पुलावर असल्यामुळे इथे काही धोका नाही याची शहानिशा करून हा निर्णय मी घेतला.आता आमची थोडी हिम्मत पण वाढली होती कारण एका मित्रानी गाडीतून उतरून कॅमेरा काढला होता काही वेळापूर्वी . 


आता आमची गाडी नवीन चालकासोबत कशी-बशी पहिल्या किव्हा दुसऱ्या गेयर वर घुर-घुर असा आवाज करत, तर कधी झटके देत चालली होती, तेवढ्यात काही अंतरावर 100-150 मीटर उजव्या बाजूला जिराफाचं जोडपं झाडाच्या फांद्याची कोवळी पाने खातांना दिसलं. जिराफ हा उंच प्राणी असल्यामुळे आम्हाला त्यांची मान दुरूनच दृष्टीस पडली, त्यामुळे आम्ही आमच्या नवख्या चालकास गाडी थांबवायला लावली, त्याने जोरात ब्रेक मारला आणि काही क्षणात आमच्या कमरेचा लचका मोडावा, असा झटका देत गाडी थांबली. थोडा वेळ कॅमेरा मध्ये जिराफाच्या जोडीला टिपायचा प्रयत्न केला पण थोड्या दूर अंतरावर आणि ते झुडुपात असल्यामुळे फक्त त्यांच्या मानेचा फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो. आता आम्हाला आमच्या जंगल सफारीच सार्थक झाल्याचं समाधान वाटायला लागला होत, कारण आता आम्हाला थोड्या-थोड्या अंतरावर प्राणी दिसत होते.



काही किलोमीटर पुढे गेलो.तेवढ्यात एक महाकाय गजराज(हत्ती) अगदी रस्त्याच्या कडेला झाडाच्या फ़ांद्या खेचत पाने खात होता. आमच्या नवख्या चालकानि मागच्या प्रसंगासारखे करकचून ब्रेक मारले, आणि आम्ही विमानातून लँडिंग व्हावे तशी आमची गाडी रस्त्याच्या मधोमध जाग्यावर थांबली. गाडीच्या झटक्याचा ताण विसरून आम्ही त्या महाकाय प्राण्यांकडे बघतच राहिलो, कारण तो हत्ती आमच्या 70-100 मीटर अंतरावर असेल बहुतेक , वळणावर असल्यामुळे तो आम्हाला दुरून दृष्टीस पडला नाही . त्या हत्तीला एवढ्या जवळून बघताच मला आपल्या भारतातील हत्तीशी तुलना करावेसे वाटले. भारतातील हत्ती पार्क मध्ये फिरतांना वगैरे सहज बघायला मिळतात.ते हत्ती लहान मुलांना सवारी करवतात आणि सोबत त्यांना आवरायला माहूत पण असतो . पण मी भारतातील जंगलातला हत्ती कधी बघितला नव्हता. हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. बिनधास्त, बेधुंद, प्रचंड ऊर्जा आणि बळ असणार हा प्राणी, त्याचे मोठे-मोठे कान , लांब लचक तीक्ष्ण तलवारी सारखे दिसावे असे सुळे दात. मला तो जणू त्यांच्या घराण्यातील म्होरक्या असावा असा वाटला. तो नक्कीच भारतातील हत्ती पेक्षा खुप अवाढव्य होता. मागे कधी मी डिसकवरी चॅनल वर हत्तीच्या काळपाबद्दल बघितलं होत, आणि व्हाट्स अप वर विडिओ पण बघितला होता, की हत्ती कसा गाडीच्या बोनेट वर बसून गाडीच्या कश्या चिंद्या करतो ते. मनात आता भीतीच काहूर माजायला लागल होत, जर तो आमच्या कडे पळत सुटला तर, तो आम्हाला सहज गाठू शकेल एवढंच अंतर होत. त्यात आमचा नव्हखा चालक वेळेवर रिव्हर्स गेयर बरोबर टाकेल की नाही माहिती नाही, आणि गियर टाकला तरी गाडी सहज मागे येईल की बंद पडेल, याची पण खात्री नाही. हत्ती बहुदा मुद्दाम कुणावर धावून येत नाही. जोपर्यंत तो चिडलेला नसेल किव्हा पिसाळलेला नसेल तर. हे ऐकलं होत, त्यामुळे कुणी जास्त आवाज करू नका, आणि चालकाला पण सूचना दिली की, उगाच एस्कलेटर वर पाय ठेऊन आवाज करू नकोस म्हणून. त्याला मागे बसूनच सूचना दिली की, रिव्हर्स गियर टाक आता, तो म्हणतो रिव्हर्स गियर कसा टाकायचा? झाल, आता डोक्यावर हात मारावा, अस वाटलं थोडया वेळा साठी, पण प्रसंग वेगळा होता.हत्ती आपला निवांत पाने खाण्यात मग्न होता, त्यामुळे आमच्या कडे वेळ होता. इकडे काही गाड्यांचा रिव्हर्स गियर थोडा वेगळा असतो भारतातील गाड्यांच्या गियर पेक्षा. गियर थोडा मध्यभागी प्रेस करून फर्स्ट गियर टाकला म्हणजे रिव्हर्स गियर पडतो. त्या प्रमाणे मी चालकाला गाईड केलं आणि उत्तम शिष्या प्रमाणे त्याने गाडी न बंद पाडता थोडी मागे घेतली. फोटो वगैरे अगोदरच काढून झाले होते. आता प्रतीक्षा होती हत्ती थोडया आत जायची, कारण तो अगदी रस्त्याच्या कडेला होता, त्याला पार करून जायचं कठीण होत आम्हाला. त्याच्या जाण्याची वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता उरला. थोडया वेळाने तो पाने खात आमच्या कडे दुर्लक्ष करत आता गेला थोडा, आणि आमचा मार्ग मोकळा करून दिला. परीक्षेची वेळ संपली होती, आणि आम्ही त्यात तरलो होतो. आता गाडी पुढे घेतली, आणि थोडया अंतरावर नेऊन चालकाला गाडी बाजूला घेऊन, थांबाय ची सूचना दिली. त्याला बोललो, मस्त चालवलीस मित्रा गाडी, आता मागे आरामात बैस, म्हणून शाबासकी दिली आणि ड्रायविंग ची कमांड मी पुन्हा माझ्याकडे घेतली.


 सायंकाळची वेळ झाली होती, सूर्य उतरणीस लागला होता. जवळपास 4:30 ते 4:45 झाले असेल, आम्ही जंगलात जवळपास 35-50 किलोमीटर आता आलो होतो. आता जवळपास तेवढाच अंतर आम्हाला दीड ते दोन तासात पार करायचा होत, कारण मोपाणी रेस्ट कॅम्पच गेट 06:30 ला बंद होणार, याची सूचना अगोदरच मिळाली होती. पुढे थोडया अंतरावर येताच, एका मोठ्या नदीचं पात्र लागलं. त्यावर निमुळता असा पूल होता. एक वाहन निघेल एवढाच पूल, जर दुसरं वाहन पलीकडून येणार असेल तर, ते त्या तीरा पलीकडेच थांबायचं, जो पर्यन्त या तीरावरील वाहन निघणार नाही. आम्ही गेलो तेव्हा दुसरं वाहन नव्हतं, योगा योगाने. त्या पुलाचा मध्यभागी वर्तुळाकार अशी जागा बनवून ठेवली होती, जेणेकरून कुणाला जर पुलावर थांबायचे असेल तर गाडी थोडी आत दाबून थांबता यावं, आणि नदीचा आनंद घेता यावा म्हणून. आम्ही थोडी विश्रांती घायच ठरवलं, आणि गाडी आत दाबून लावली. पाणी जेमतेमच असेल नदीला. उतार असल्यामुळे पाणी जास्त वेळ थांबत नाही इथे. पुलाच्या खाली बघताच एक महाकाय मगर पाण्याच्या तीरावर निवांत सुस्त पडली होती. आम्हाला ती निवांत वाटत होती, पण ती पाण्याच्या हालचालीवर घात लावून बसली होती. आम्ही काही फोटो घेतले तिचे, आमच्या बोलण्याच्या आवाजामुळे, ती लगेच उठून, पाण्यात सर-सर पोहत निघून गेली. तिथून निघताना आम्हाला गुगल म्याप वर कळलं की, त्या पुलाचा नाव क्रोकोडाईल ब्रिज आहे म्हणून. 




सायंकाळची वेळ झाल्यामुळे आता पक्षांचे आणि प्राण्याचे आवाज कानावर पडू लागले होते. वातावरणात थोड थंड झाल्यामुळे प्राणी जंगलाच्या बाहेर पडून रस्त्यावर दिसायला सुरवात झाली होती. काही अंतर गाठताच रस्ताच्या कडेला झेब्र्यांचा झुंड गवतावर ताव मारत होता. तीक्ष्ण पटे असणारा हा प्राणी दिसायला खूप सुंदर दिसतो. आपल्या भारतात तो दिसत नाही, त्यामुळे त्याला जवळून पाहायला मिळाल याची धन्यता मला वाटली. आम्हाला त्यांनी फोटो पोज देऊन फोटो काढायची थोडी संधी दिली, आणि काही क्लिक आम्ही मिळवले. जवळपास घोड्या सारखिच शरीरवृष्ठी असणारा हा प्राणी पण थोडा लाजरा वाटला किव्हा आम्हाला पाहून घाबरला असावा कारण आम्हाला बघताच तो त्यांचा कळप आत जंगलात निघून गेला. आता अंधार पडायला लागला होता गाडी थोडी पाळावयाची असं आमचं ठरलं होत पण टप्प्या टप्प्याने प्राणी दिसत होते म्हणून थांबायचा मोह आवरत नव्हता. 

थोडे अंतर पार केले तसेच रस्ता पार करत एक मोठा कासव रस्त्यावरून चालत होता मला तो दुरूनच दिसला होता कारण रस्ता सरळ होता म्हणून मी गाडीचा वेग कमी केला आणि त्याचा जवळ गाडी येत पर्यंत त्याने रस्ता पार केला होता एक दोन क्लीक मिळाले असेल आम्ही तेवढ्या वेळात आणि तो गवतात तुरु-तुरु चालत निघून गेला. लहान असताना खुप वेळा कासव-सश्याची गोष्ट ऐकली होती आणि माझ्या मुलीला पण मी ऐकवली होती आणि त्या गोष्टीतला कासव धावायची शर्यत जिंकला असतो. प्रत्यक्षात कासव कसा धावतो नि किती वेगाने पळू शकतो आणि तो शर्यत पण कसा जिंकू शकतो याचं प्रात्यक्षिकच जणू मला बघायला मिळालं याची धन्यता मला वाटली . 







आमची गाडी पुढे चालली होती आता कासवाचा निरोप घेऊन थोडया अंतरावर आफ्रिकन माकडाचा कळप रस्ता पार करत होता म्हणून मी गाडी थांबवली 20-25 लहान- मोठी माकडं असेल, ते दिसायला नक्कीच भारतातील माकडांपेक्षा थोडी वेगळी होती त्यातला मोठा माकडं आम्हाला वाकुल्या दाखवून उड्या मारत जंगलात निघून गेला. तो बहुदा त्या माकडांचा आजोबा असेल असं वाटलं. थोडया अंतरावर इंपाला(हरणांची एक प्रजाती) नावाच्या हरणांचा कळप दिसला ते सायंकाळच्या मंद प्रकाशात मस्त खेळ-खेळण्यात मग्न होते. 
















आता जवळपास संद्याकाळचे सहा वाजले होते. इथे आफ्रिकेत उन्हाळ्यात सूर्वोदय जवळपास सकाळी साडेचार ते पाऊणे पाच ला होतो आणि सूर्यास्त संद्याकाळी साढे सहा ते सात ला होतो. त्यामुळे अंधार पडला होता आणि आणखी गेट ला पोहोचायला 10 किलोमीटर बाकी आहे असं गुगल मॅप्स मध्ये दाखवत होतं. या आफ्रिकेच्या जंगलात कातरवेळी आमची वाट रात किड्यांच्या किर्रर्र अशा आवाजाला कापत मोपाणी रेस्ट कॅम्पच्या गेटच्या दिशेने चालली होती. 

दोन किलोमीटर गेटला पोहोचयाला बाकी असताना रस्त्याची वाट डोंगरावर वळली नि उंच अश्या त्या डोंगरावर जवळपास 50-100 एकर परिसरात हे रेस्ट कॅम्प वसवलं होतं त्याच्या गेट वर गाडी थांबवली. आमचे बुकिंग चे कागदपत्रे चेक करून फ़ॉरेस्ट गार्ड नि आत सोडलं. तिथे स्वागत कक्षामध्ये जाऊन राहायच्या गेस्ट हाऊस ची चावी मिळवली.या रेस्ट हाऊस मध्ये सर्व आधुनिक सोयी बघून आश्चर्य वाटलं आणि थोडी धन्यता पण वाटली कारण आता मोबाईल ला रेंज आली
होती, आत पेट्रोल पंप, स्वीमिंग पूल, किराणा दुकान, रेस्टोरंट, पब वगरे होतं. जंगलात एवढ्या सोयी मिळेल याची मला अपेक्षा पण नव्हती. रेस्ट हाऊस ला त्यांनी दिलेल्या मॅप चा मदतीने गेलो आणि ते घर बघून आश्चर्याचा आणखी सुखद धक्का मिळाला. ते घर बहुधा लाकडांनी बनवला होतं,झोपडीच्या आकाराच्या त्या घरात सर्व अत्याधुनिक सोयी होत्या जसे एसी, फ्रिज, इलेक्ट्रिक शेगडी, बाथ टब, सर्व किचनची भांडी आणि महत्वाचं म्हणजे नॉन-व्हेज भाजायला ब्राय स्टॅन्ड. आता प्रवासात पहिला दिवस संपला होता आणि आम्ही जवळपास सातच्या सुमारास आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो पण मनात सर्व प्रवास जणू येऊन-येऊन डोळ्या समोर उभा होतं होतं.




रात्रच जेवण आटपून आम्ही रेस्ट कॅम्प ला फेर फटका मारायचं ठरवलं.इथे रात्रीच्या सफारीची व्यवस्था असते पण ती सफारी फ़ॉरेस्ट  च्या  वाहनानेच  करावी लागते.रात्री 9-12 चा सुमारास ती सफारीची व्यवस्था असते असे स्वागत कक्षाला गेलो तेव्हा कळलं होतं .प्रवासात फार थकल्यामुळे आम्ही आज आराम करायचं ठरवलं होतं.





रात्रीचे जवळपास 10 वाजले असेल. वरती निरभ्र आकाश,  लक्ख चांदण्यांनी आच्छादून गेले होतं. सभोवताली दाटीने वाढलेली झाडें होती व  रात किड्यांचा किर्रर्र-किर्रर्र आवाज कानावर  पडत होता. काही ठराविक अंतरावर एक-एक  घर असे जवळपास 50-100 घरे असावे त्या रेस्ट कॅम्प मध्ये.जणू तेथे एक छोटेखानी गावाचं वसवलं आहे असं वाटलं . रेस्ट कॅम्प ला सभोवताली  तारेचे कुंपण केलेले होते,  जेणेकरून कुठलाही जंगली प्राणी आत येऊ नये.


काही दूर अंतर चालत गेल्यावर तिथे फ़ॉरेस्ट गार्ड निवांत गप्पा मारत बसले होते. आम्हाला तिथे बघताच एक गार्ड थोडया दबक्या आवाजात आम्हाला बोलला "Liones killed chinkara that side"(सिंहनीने चिंकारा ला मारले आहे तिकडे).तर मी पण त्याला बोललो "We came here to see Lion" आम्ही इथे सिहं पाहायलाच आलोय आणि सर्वांच्या हशा पिकल्या हा हा हा. तो आम्हाला घाबरावयाचा प्रयत्न करत होता हे कळलं होतं. थोडया वेळ फेर फटका मारून आम्ही रेस्ट कॅम्प ला परतलो आणि उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा जंगल सफारी चा बेत आखायचं आमचं ठरलं.


दुसरा दिवस..

इथे उन्हाळा असल्यामुळे सकाळी 4:45 ते 5 लाच दिवस उजाडतो. आदल्या दिवशीचा सर्वाना थकवा असल्यामुळे आम्हाला कुणालाच सकाळी लवकर जाग आली नाही. सर्व जण सकाळी 7-8 च्या सुमारास झोपून उठलो. दिवस उजाडून बाहेर लक्ख ऊन पडला होतं.
आम्ही सर्व तयारी करून, ब्रेकफास्ट उरकवुन लवकर जंगलात निघायचं ठरवलं. कारण सकाळी वातावरण थंड असल्यामुळे प्राणी दिसायची शक्यता जास्त असते हे माहिती होतं. पण आम्ही ती वेळ गमावली होती. रेस्ट हाऊस च्या स्वागत कक्षाकडे पोहोचून, थोडी जंगलाची माहिती घायची , आणि कुठल्या भागात काय प्राणी दिसायला मिळेल याची पण माहिती घायची असं ठरवलं .




स्वागत कक्षातील कर्मचाऱ्याने आम्हाला जंगलाची आणि कुठल्या भागात काय प्राणी दिसेल याची व्यवस्थित माहिती दिली. आम्हाला सर्वांनाच सिंह आणि चित्ता बघाईची उत्सुकता लागली होती कारण बहुतांश प्राणी आम्हाला आदल्या दिवशी बघायला मिळाले होते. स्वागत कक्षाजवळ क्रुगर नॅशनल पार्कचे दोन नकाशे काढले होते . त्यात काल आणि आज कुठल्या-कुठल्या भागात काय प्राणी दिसले हे वेगवेगळ्या कलर पीन्स नी चिन्हित केलं होतं.बहुदा ते पर्यटकांच्या सांगण्यानुसार किव्हा फ़ॉरेस्ट कर्मचाऱ्यांचा सांगण्यानुसार चिन्हित केलं असेल.

आता जंगलाच्या राजाला बघायची आम्हाला उत्सुकता लागली होती. नकाशातील माहिती प्रमाणे आणि स्वागत कक्षातील कर्मचाऱ्याच्या माहिती नुसार सातारा रेस्ट कॅम्प च्या भागात सिंह असल्याची मागिती मिळाली होती. त्याप्रमाणे आम्ही आमचा मार्ग ठरवला. सातारा रेस्ट कॅम्प हा आम्ही मुक्कामाला असलेल्या मोपाणी रेस्ट कॅम्प पासून 119 किलोमीटर अंतरावर होता.आजचा प्रवास आम्ही आतल्या रस्त्यानी करायचं ठरवलं होतं पण आतले सर्व रस्ते कच्चे आहेत. त्या रस्त्यावर वेग मर्यादा 40 किलोमीटर/ताशी एवढीच ठेवायची होती.कच्या रस्त्याने जायचं कारण हेच की प्राणी दिसायची जास्त शक्यता असते व ते रस्ते दाट जंगलातून जातात. मोपाणी रेस्ट कॅम्प पासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर लेताबा रेस्ट कॅम्प आहे तिथे आम्ही लंच ब्रेक घायच ठरवलं.

सकाळचे जवळपास 9 वाजले असेल पण उन्हाचे चटके जाणवायला लागले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दिवसभर तापमान 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार होते. महत्वाचं म्हणजे इथल्या हवामान खात्याचा अंदाज खुप अचूक असते. कडक उन्हामुळे प्राणी दिसायची कमी शक्यता आहे हे आम्हाला लक्षात आले कारण 10-15 किलोमीटर आता जंगलात फिरून पण काही हरणाच्या कळप सोडला तर प्राणी दिसत नव्हते. पण आम्ही आशा सोडली नाही, आमच्या नजरा जणू दाही दिशांनी भिरभिरत होत्या. प्रत्येक हालचालीवर आम्ही लक्ष ठेऊन होतो.

काही अंतरावर एक मोठी नदी लागली. नदीच्या कडेला जाताच आम्हाला त्या नदीत चार-पाच हिप्पो यथेच्छ डुबक्या मारत बसलेले दिसले. थोडया अंतरावर जवळपास 10-15 शहामृगांचा कळप दिसला. दिसायला उंच, लांब लचक मान, पक्षि प्रजातीत मोडणारा सुंदर हा पक्षी एवढ्या जवळून बघायला मिळाल्याचं समाधान वाटलं.




आमची गाडी या कच्या रस्त्यावर दगड धोंडे उडवत,जंगलाच्या आडवाटानी पुढे चालली होती. आम्ही आता जंगलाच्या उत्तरेकडून दक्षिण दिशेला निघालो होतो. काही अंतर पार केल्यावर आमचा रस्ता डोंगर माथ्यावर वळला. त्या डोंगरावरून संपूर्ण जंगल दृष्टीस पडत होते . दूर-दूर पर्यंत पसरलेली वनराई आणि सभोवताली डोंगर-दऱ्यानी वेढलेल्या या जंगलाचं भव्य-विस्तीर्ण रूप आम्हाला बघायला मिळालं. कितीतरी हजारो वर्ष ही वनराई इथेच वास्तव करून असेल अशीही कल्पना क्षणात माझ्या मनात आली.




आता हे जंगल आपलंस वाटायला लागलं होतं, मनातून सर्व भीती निघाली होती. प्रत्येक वळणावर काही नवीन बघायला मिळत होतं.थोडया थोडया अंतरावर काही हत्ती आणि झेब्रांचा झुंड दिसले , पण आता जंगलाच्या राजाला बघायचं होतं म्हणून तिथून लगेच निघालो. वाटेत अनेक पर्यटकांच्या गाड्या दिसत होत्या. ते हात हलवून अभिवादन करत होते. बहुतेक पर्यटक गोऱ्या वर्णाचे होते.

दुपारचे जवळपास 12 वाजले होते. उन्हामुळे राहून राहून घसा कोरडा पडत होता. मूळचा विदर्भाचा असल्यामुळे मला तशी उन्हाची सवय होती पण इथलं ऊन वेगळं होतं. कडक व टोचणार हे ऊन आहे हे जाणवत होतं. आम्ही जवळपास 50 किलोमीटर जंगलात फिरलो होतो, आम्ही आता लेताबा रेस्ट कॅम्प जवळ पोहोचलो होतो. ठरल्याप्रमाणे इथे लंच साठी थांबलो. या जंगलात काही ठराविक अंतरावर पर्यटकांच्या सोयीसाठी रेस्ट कॅम्प वसवले आहे. आणि प्रत्येक रेस्ट कॅम्प ला खाण्या-पिण्याच्या, राहायच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहे. लेताबा रेस्ट कॅम्प च्या आत जाताच काही हरणे सहज फिरतांना दिसले. ते बहुदा तिथे पाळलेले होते. काही लहान मुले व मोठेही स्विमिंग पूल मध्ये पोहत होते. आम्ही रेस्ट कॅम्प मधल्या एका रेस्टॉरंट मध्ये लंच करायच ठरवलं.

दुपारचे जवळपास दोन वाजले असेल, आम्ही लंच उरकवुन लेताबा रेस्ट कॅम्प वरून सातारा रेस्ट कॅम्प च्या दिशेने निघालो.या वेळेला पण आम्ही कच्या रस्त्याने जायचं ठरवलं. जंगलाच्या राजाला बघायला आम्ही जंगलाच्या प्रत्येक हालचाली वर लक्ष ठेऊन होतो. पण काहीतरी दुसराच प्राणी दिसत होता. काही अंतरावर चार-पाच जिराफ झाडांची पाने खात होती. जवळच 100 मिटर अंतरावर असेल ते जिराफ आमच्यापासून . उंच, लांबच-लांब मान, लांब-लांब पाय, आकर्षक रंगाचा हा अवाढव्य आणि विशालकाय शरीरवृष्टीचा हा प्राणी. त्याला पण उन्हाचे चटके जाणवत होते राहून राहून झाडांच्या फांद्यामध्ये शिरायचा प्रयत्न तो करत होता पण एवढ्या मोठ्या शरीराचा कुठला नी कुठला भाग उन्हात येत होता कारण झाडें झुडपे लहान होती.जिराफांना निरोप देऊन आम्ही पुढे निघाली. एका ओढ्याच्या किनारी दोन महिला पर्यटक 25-30 वयाच्या असेल कदाचित, आपली गाडी कडेला लावून दूर असलेले हिप्पो ला त्या बघत होत्या. त्यांना एकट जंगलात सफारी करतांना बघून मला त्यांचं कौतुक वाटलं. आम्ही येताच त्यांनी हात हलवून अभिवादन केलं. थोड्या वेळ तिथे थांबून आम्ही पुढे निघालो.


आता दुपारचे जवळपास साडेतीन-चार वाजले होते आणि सातारा रेस्ट कॅम्प आणखी 25-30 किलोमीटर अंतरावर होता. काही अंतर पार करताच जंगलाचं रूप बदललं. आता दाट जंगल संपून, मोकळी, गवताची आणि काही झुडपे असलेलं जंगल दिसायला लागल. दुरवर गवत असल्यामुळे आता प्राण्याचे कळप दिसायला लागले होते, आम्ही सातारा रेस्ट कॅम्प चा परिसरात पोहोचलो होतो, हत्त्यांचे कळप, झेब्रांचे कळप गवतावर ताव मारताना दिसत होते पण सिंह काही दिसत नव्हते. शेवटी तो जंगलाचा राजा आपल्या मर्जीचा मालक. त्याला वाटेल तरच तो दर्शन देणार. आम्हाला आता अस्वस्थ वाटायला लागले होते, जवळपास पाच वाजले असावे आणि सातारा रेस्ट कॅम्प आणखी 10 किलोमीटर दूर होते. आम्हाला इथून आणखी जवळपास 120 किलोमीटर उत्तरेकडे आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोपानी रेस्ट कॅम्प ला पोहोचायचं होतं. माहिती प्रमाणे रेस्ट कॅम्प चा गेट संध्याकाळी 6:30 ला बंद होणार होतं. आणि जंगलाच्या ठरवून दिलेल्या वेग मर्यादेप्रमाणे(60 किलोमीटर/ताशी) गेलो तर आम्हाला मोपाणी ला पोहोचायला आणखी 2 तास लागणार होता. आम्ही सिंहाला न बघताच इथून निघायचं ठरवलं, सूर्य उतरणीस आला होता आता आम्ही कुठेही न थांबता मुक्कामाचा दिशेने निघालो.

संद्याकाळ व्हायला लागली होती, आता प्राणी रस्त्याच्या कडेला दिसायला लागले होते, आम्हाला अनेक जंगली कोंबडया वाटेत आडव्या गेल्या, काही अंतरावर दोन हायना(कोल्हे) रस्त्याच्या कडेला दिसले म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि काही फ़ोटो घेतले.
वाटेत नीलगायी, सांबर, हरणे असे अनेक प्राणी रस्तात दिसले.





काही अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी एक 20-25 हरिणांचा कळप बसला होता, अंधार पडला असल्यामुळे दूरचे दिसायला कठीण होते.अचानक एवढे हरणे रस्त्याच्या मधोमध दिसताच मी गाडीचा ब्रेक मारला. आणि गाडी त्यांच्या काही फूट अंतरावर येऊन थांबली. नशीब कुठल्या प्राण्याला काही इजा झाली नाही. त्या कळपात लहान-लहान हरणाचे बछडे होते. आमची गाडी थांबताच ते उठले व आमचा मार्ग मोकळा करून दिला.


आता जवळपास संद्याकाळचे 6:15 वाजले होते आणि आम्हाला आणखी 30 किलोमीटर जायचे होते रेस्ट कॅम्प ला पोहोचायला. सूर्योदय होतं होता, सर्व आकाश तांबड्या केशरी रंगाने व्यापलं होतं, नयनमय असं ते दृश्य होतं. माझ्या आयुष्यात मी बघितलेला सुंदर आणि अविस्मरणीय असा तो सूर्यास्त होता.




गाडी हळू-हळू डोंगराच्या दिशेने जात होती आणि जवळपास संध्याकाळी 6:45 चा सुमारास आम्ही मोपाणी रेस्ट कॅम्प चा प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. थोडा उशीर झाला असल्यामुळे फ़ॉरेस्ट गार्डनी आम्हाला थोड्या वेळ थांबवून चौकशी करून आत सोडले.
दिवसभर कडक उन्हात फिरल्यामुळे सर्व जण थकलो होतो . सिंहाच्या शोधात आम्ही अक्खा जंगल पालथं घातल होतं पण त्यात आम्हाला यश नाही मिळालं याची जाणून-जाणून खंत वाटत होती माझ्या मनाला. पण अप्रतिम असं जंगलाचं रूप आम्हाला आज बघायला मिळालं याचं समाधानही मनाला वाटलं. आज लवकर झोपून उद्या सकाळी लवकर जंगलात निघायचं आम्ही ठरवलं आणि अश्या प्रकारे आमचा आफ्रिकेच्या जंगलातील दुसरा दिवस संपला.

तिसरा दिवस

आज पहाटे चार ला आमचा दिवस उजाडला. सर्वाना सकाळी लवकर जाग आली. बाहेर आणखी थोडा अंधारच होता. पण हळू हळू उजाडायला लागल होतं. पक्षांचा चिव-चावट सुरु झाला होता. मी लवकर तयारी करून बाहेर रेस्ट कॅम्प मध्ये फेर फटका मारायचं ठरवलं.

बाहेर पक्षांचे सुरेख आवाज कानावर पडत होते,हळूच एक देखणी खार सर-सर झाडावर चढली आणि तिथून डोकावून मला बघत होती. थोडया आत गेलो तर एक किडा किर्रर्र असं कर्कश आवाज करत होता. एक रान कोंबडी तुरु-तुरु धावत लगेच आत झाडा-झुडपात निघून गेली. सकाळचं जंगलातील विश्व काही वेगळाच असतं. आणि त्या विश्वात मन रमून जाते. मी फेर-फटका मारून आलो तेव्हा सर्व मित्र तयारी करून होते. आम्ही जवळपास सकाळी 5 ला रेस्ट कॅम्प मधून जंगलात निघालो. मनोमनी सर्वाना वाटत होते की आज आम्हांला सिंहाचे दर्शन नक्की होईल.

आता आम्ही जंगलाच्या पूर्व दिशेला जायचं ठरवलं. पूर्वेला म्हणजे मोझाम्बिक या देशाच्या दिशेला.
पण जवळपास 100 किलोमीटर पुढे जाऊन परतायचा असे आम्ही ठरवले. कारण आजच आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. पूर्वेला जवळपास 30 किलोमीटर गेलो पण हरणाच्या कळपा शिवाय काही प्राणी दिसले नाही. त्यामुळे आम्हाला असे वाटले की पूर्वेला विशेष प्राणी नसावे म्हणून आम्ही पूर्वे कडून खाली दक्षिणेला जायचं ठरवलं. दक्षिण दिशेला काही अंतर गेलो नी परत आम्हाला प्राणी दिसायला लागले. एक जंगली गायींचा कळप दिसला. काही अंतरावर गेलो तर बायसन चा अक्खा 50-100 जनावरांचा कळप दिसला. त्या कळपा जवळच 20-25 झेब्र्यांचा कळप होता. आज जंगलातील प्राण्याचं एवढं मोठं कुटुंब आम्हाला बघायला मिळालं आणि तेही अगदी जवळून . या कळपात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व वयाचे प्राणी होते .

सकाळी सकाळी जणू सर्व वन्य प्राणी आम्हांला भेटायला आले असेल असं क्षणभर मनात आलं. पुढे काही अंतरावर एक वयस्थ हायना (कोल्हा) आमच्या गाडीचा समोर-समोर चालत होता. तो जवळपास एक किलोमीटर आमच्या गाडीच्या समोर-समोर चालत होता. आता हायना ला निरोप देऊन आम्ही पुढे गेलो तर विलक्षण सुंदर असा पक्षी बघायला मिळाले. प्रखर, सुंदर, करड्या आणि तांबड्या रंगाचा हा पक्षी मी पहिल्यांदाच बघितला असेल कदाचित.या पक्ष्याचा फोटो घ्यायला मी गाडी कच्या रस्त्यावरून आत थोड्या मैदानी भागात घेतली आणि सुंदर असा तो पक्षी जवळून कॅमेरात टिपला. नंतर टप्या टप्याने सुंदर पक्षी बघायला मिळाले.


सकाळचे जवळपास 9 वाजले होते आम्हाला परत रेस्ट कॅम्पला जाऊन परतीचा प्रवास करायचा होता. त्यामुळे आम्ही रेस्ट कॅम्प चा दिशेने निघालो. या तीन दिवसात मी पुरता स्वतःला हरवून या निर्सगाच्या अद्भुत, अकल्पनीय विश्वात एकरूप झालो. पुढच्या भेटीत सिन्हाचे दर्शन नक्कीच करू या आशेने आम्ही या जंगलाचा निरोप घेतला.